छत्रपती संभाजीनगर : वडिलोपार्जित जागेचा वाद ः एकावर चाकू हल्ला

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः वडिलोपार्जित जागेवरून वाद होऊन एकावर चाकूहल्ला केल्याची घटना उस्मानपुरा गुरुद्वारासमोर घडली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल बाबुलाल यादव, वैभव बाबुलाल यादव, शाम तावडे व स्वप्निल लिंगायत अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी शैलेंद्र लक्ष्मण यादव रा.उस्मानपुरा गुरुद्वारासमोर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 11 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वडिलोपार्जित घराच्या कारणावरून वाद झाला. फिर्यादी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना श्‍याम तावडे आणि स्वप्निल लिंगायत यांनी त्यांना अडवून मारहाण केली. तसेच विशाल यादव यांनी फिर्यादीच्या डोक्यात चाकू मारून जखमी केले. उस्मानपुरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोखंडी रॉडने एकावर हल्ला
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः भांडण बघणाऱ्याला एकाला तू इधर क्यू देख रहा है असे म्हणत लोखंडी रॉडने बदडल्याची घटना जय टॉवर अहिल्याबाई होळकर चौक परिसरात घडली. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश बोर्डे, विशाल नाथभजन व नौडी उर्फ अनुज पगडी अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी दुर्योधन उर्फ अनिकेत जनार्धन वाहुळ रा. क्रांतीनगर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 10 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी अंडा आम्लेटच्या गाडीवर पार्सल घेऊन उभे होते. यावेळी बाजूच्या पाणीपुरी वाल्याला आरोपी शिव्या देत होते. फिर्यादींनी त्यांच्याकडे पाहिले असता तू क्यू देख रहा है म्हणत वाद केला. भांडू नका असे सांगितले असता तुला काय करायचे म्हणून आरोपींनी हातातील लोखंडी रॉडने फिर्यादींच्या डोक्यात मारून जखमी केले. वेदांतनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

विट्स हॉटेल चौकात एकाला लुटले
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः कामावरून घरी जाणाऱ्या दुचाकीस्वाराला विट्स हॉटेल चौकात लुटल्याची घटना 10 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय उमेश सोनवणे रा.गादीया विहार रोड यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 10 डिसेंबर रोजी फिर्यादी विट्स हॉटेल चौकात मोटरसायकल उभी करून फोनवर बोलत होते. त्यावेळी स्पोर्ट्स बाईकवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादीला पैसे मागितले. माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्यावर तिघांनी मारहाण करीत धारदार शस्त्राने हाताच्या पंजावर मारून जखमी केले. वेदांतनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः जागेच्या कारणावरून भाजी विक्री करणाऱ्या महिलेला मारहाण केल्याची घटना दर्गा रोड तापडिया नगर परिसरात घडली. या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल नजन, अनिल नजन, ज्ञानेश्‍वर शिंदे, भागवत शिंदे, निकिता अमोल नजन, मनिषा भागवत शिंदे रा. बाळापुर ता. जि. छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सरस्वती भीमराव मंडलिक रा. गल्ली नंबर 5 आनंद नगर गारखेडा यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 10 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास व्यवसायाच्या जागेवरून आरोपींनी वाद केला. लाकडी दांडाने मारहाण करून फिर्यादीला जखमी केले. जवाहरनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

शेजाऱ्यांचा महिलेवर चाकू हल्ला
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः शेजारी राहणाऱ्यांनी महिलेवर चाकू हल्ला केल्याची घटना वेंकटेश नगर वैशाली धाबा परिसरात घडली. या प्रकरणी आरोपीवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबाना बबलू शहा, बबलू शाह हरूण शहा, खलील शहा, अल्फिया बबलू शहा, अस्मिना सलीम शहा, फरझाना मोहम्मद शहा, सय्यद जिलानी, मुनाफ हाजी बागवान रा. व्यंकटेश नगर वैशाली धाब्याजवळ अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी तबस्सुम शेख अरमान रा. राठी संसार पिसादेवी रोड (मुनीर इनामदार यांच्या घरात किरायाने) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 7 डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी व त्यांची मुलगी व्यंकटेश नगर वैशाली धाबा घर नंबर 22 या त्यांच्या स्वतःच्या घरी गेल्या होत्या. आरोपींनी संगणमत करून इथे का आलीस असे म्हणत मारहाण केली. तसेच चाकूने फिर्यादींच्या डाव्या हाताच्या मनगटावर चाकू मारून जखमी केले. तू जर परत इथे आलीस तर तुला जीव मारून टाकू अशी धमकी दिली. सिडको पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आशा वर्करला मारहाण
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः बाळाला लस देण्यास विरोध करीत एका महिलेने आशा वर्करला मारहाण केल्याची घटना साहस सोसायटी विजयनगर परिसरात घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालिनी विकास रोकडे रा. साईनगर जानकी हॉटेल जवळ असे आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पूजा रुपेश दहिटे रा. विजयनगर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 9 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या  सुमारास विजयनगर येथील अष्टविनायक गणपती मंदिर येथे लहान बाळाचे लसीकरण सुरू होते. यावेळी आरोपी शालिनी रोकडे हिने तिच्या चार महिन्याच्या बाळाला लसीकरणासाठी आणले होते. शालिनीने बाळाच्या तीन लस घेतल्या मात्र उर्वरित दोन लस घेण्यास नकार दिला. उपस्थित असल्यास सिस्टर अर्चना राठोड यांनी तिला समजावले. मात्र तिने ऐकले नाही. लसीकरण कार्डावरील तारीख कट करत असताना शालिनी हिने फिर्यादींचे केस धरून मारहाण केली. सोबत असलेल्या आशा वर्कर यांनी फिर्यादींना तिच्या तावडीतून सोडवले. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपीवर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.